गिट्टी खाणीच्या खड्यात पडून बालकाचा मृत्यू

चंद्रपूर

वरोरा तालुक्यातील चरूर (खटी) शेतातील तीस फूट खोल खड्ड्यात बुडून एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काल शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमाराला ही घटना घडली. अनुज किरण ठाकरे असे या मुलाचे नाव आहे.

चरूर खटी येथे जवळपास तीन व्यावसायिकांचे गिट्टी क्रेशर (खाण) आहे. याठिकाणी ३० ते ३५ फुटांचे खोल खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये बाराही महिने पाणी साचून असते. त्यातीलच एका खड्ड्यात अनूजचा मृत्यू झाला. अनुज शेतात आला हे कुणालाही माहित नव्हते. तो शेतात असतानाच नकळत खड्डयाकडे गेला आणि बुडाला. रात्री अकरा वाजताच्या सुमाराला त्याच्या मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला. मृतकाचे वडील किरण ठाकरे आणि आजोबा शेतात होते. या गावातील ३० ते ३५ एकर शेतात गिट्टीच्या खाणीसाठी खोदकाम झाले आहे. या खड्डयांमध्ये पाणी साचून असते. यापूर्वीही पाच जणांचे जीव यात गेले आहेत. गिट्टी खाणीच्या परिसराला खाण मालकांनी संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments