गोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले

भंडारा
 भंडारा जिल्ह्यातील महाकाय गोसेखुर्द धरणातून तब्बल 22 हजार 782 क्‍यूमेक्‍स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नदी, नाल्या फुगत असून जिल्ह्यात पुराची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नदी, नाल्यांच्या काठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने गोसेखुर्द धरणाचे 25 दरवाजे 3 मीटरने, तर 8 दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून त्यातून तब्बल 22 हजार 782 क्‍यूमेक्‍स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चालू आठवड्यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाल्यांना पूर आला आहे.

इतिहासातील सर्वांत मोठा विसर्ग

गोसेखुर्द धरणातील जलसाठाही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. 29) दुपारी 3 वाजता या धरणाचे 25 दरवाजे 3 मीटरने, तर 8 दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून 22 हजार 782 क्‍यूमेक्‍स पाणी सोडण्यात येत आहे. गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. गोसेखुर्द धरणातून 24 ऑगस्ट 2013 रोजी 16 हजार क्‍यूमेक्‍स, तर 9 सप्टेंबर 2019 रोजी 13 हजार 739 क्‍यूमेक्‍स पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी सर्वाधिक पाणी सोडण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments