...तर दोन वर्षाचा आतच कोरोनाचा खात्मा करता येऊ शकतो

जिनिव्हा : जगभरात करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी जगभरात विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही लशींवर संशोधन सुरू असून चाचणीही अंतिम टप्प्यात आली आहे. करोनाचा हाहाकार सुरू असताना दोन वर्षाच्या आतच करोनाचा खात्मा करता येऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घ्रेबेयसस यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घ्रेबेयसस यांनी शुक्रवारी म्हटले की, १०२ वर्षांपूर्वी आलेली स्पॅनिश फ्लूची साथ दोन वर्षांत संपली होती. जगभरातील देशांमध्ये एकजूट कायम राहिल्यास आणि परिणामकारक लशीचा शोध लागल्यास करोनाही दोन वर्षांत संपू शकतो.

शंभर वर्षातून असा एखादा आजार निर्माण होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. स्पॅनिश फ्लूमुळे फेब्रुवारी १९१८ ते एप्रिल १९२० दरम्यानच्या या दोन वर्षाच्या कालावधीत जगभरात जवळपास दोन कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.

टेड्रोस घ्रेबेयसस यांनी सांगितले की, जागतिकीकरणामुळे करोनाच्या संसर्गाच्या प्रसार १९१८ च्या तुलनेत अधिक झाला आहे. मात्र, त्या काळाच्या तुलनेने आजच्या काळात विषाणूला अटकाव करण्यासाठी आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले. विषाणूला रोखण्यासाठी १९१८ मध्ये एवढं तंत्रज्ञान, आरोग्य सेवा एवढी विकसित नसल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळात एकमेकांशी संपर्कात येण्याची शक्यता अधिक आहे. जागतिकीकरणामुळे करोनाचा विषाणू विद्युत वेगाने जगभरात फैलावला असल्याचे टेड्रोस यांनी सांगितले. करोनाच्या संसर्गामुळे जगभरात दोन कोटी ८१ लाखाहून अधिक बाधित झाले आहेत. तर, सात लाख ९३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments